सिन्नर, (प्रतिनिधी) १२ एप्रिल - तालुक्यातील पंचाळे येथे शुक्रवारी मध्यरात्री काळाने भीषण घाला घातला. पाथरे येथून जागरण-गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर पिकअपने पेट घेतल्याने केबिनमध्ये अडकलेल्या नवदाम्पत्यासह चौघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे पंचाळे गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली असून, एकाच वेळी चार सरण पेटल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
पंचाळे येथील मोरे, गांगुर्डे आणि नवले कुटुंबीय पाथरे येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री कार्यक्रम आटोपून ते पिकअप (MH 15 JC 6333) मधून गावाकडे परतत होते. पंचाळे हायस्कूलजवळ वाहन आले असता, समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने (MH 14 MT 3839) पिकअपला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की पिकअपच्या इंजिनने तत्काळ पेट घेतला.
जिवंत जाळल्याने मृत्यू, ७ जण जखमी
आगीचा भडका उडाल्याने गाडीच्या केबिनमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. यामध्ये किरण रवींद्र मोरे (२३), शुभम गणेश नवले (२१), रिंकू शुभम नवले (१९) आणि मिराबाई विश्वनाथ गांगुर्डे (६८) या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यातील शुभम आणि रिंकू यांचे लग्न अवघ्या वर्षापूर्वीच झाले होते, तर मिराबाई या रिंकूच्या आई होत्या. या भीषण दुर्घटनेत गाडीच्या मागील बाजूस असलेल्या ७ प्रवाशांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले, मात्र ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिन्नर व नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गाव अश्रूंमध्ये बुडाले
शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर चारही मृतदेह पंचाळे गावात आणण्यात आले. दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात चारही मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गाव या दुर्दैवी घटनेने सुन्न झाले असून, प्रत्येक घराबाहेर ग्रामस्थांचे डोळे पाणावलेले होते. एकाच वेळी चार जणांना निरोप देण्याची पंचाळे गावातील ही पहिलीच आणि अत्यंत दुःखद वेळ ठरली.
दोषी चालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी गणेश संपत नवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयशर चालक प्रवीण अशोक काळे (रा. खोडद, ता. जुन्नर) याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील करत आहेत.
अपघातातील बळी आणि जखमी:
मृतक: किरण मोरे (२३), शुभम नवले (२१), रिंकू नवले (१९), मिराबाई गांगुर्डे (६८).
जखमी: सुनीता नवले, सचिन नवले, दिव्या नवले, समीक्षा गांगुर्डे, आदिती आहेर, आरती आहेर, देवांश मोरे (२ वर्ष).
?s=20