पुणे, (प्रतिनिधी) ११ एप्रिल - तुमच्या घरात डास पळवण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या अगरबत्त्यांमुळे तुम्हाला शांत झोप लागत असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. ज्या धूरात तुम्ही सुखाची झोप घेताय, तोच धूर तुमच्या कुटुंबासाठी 'विषप्रयोग' ठरू शकतो, असा खळबळजनक खुलासा नुकत्याच झालेल्या एका कारवाईतून समोर आला आहे. राज्यातील प्रसिद्ध 'कम्फर्ट' आणि 'स्लीप वेल' सारख्या डास प्रतिबंधक अगरबत्त्यांवर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
नेमकं प्रकरण काय?
'कम्फर्ट' अगरबत्तीमध्ये मेपरफ्लुथ्रिन या घातक कीटकनाशकाचा वापर केला जात असल्याची तक्रार राज्याच्या प्रधान सचिवांकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत ठाणे विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी संबंधित धूप छाप कंपनीवर छापा टाकला. यावेळी तिथे २९ अगरबत्तीचे बॉक्स आढळून आले. त्यापैकी नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील NIPHM (National Institute of Plant Health Management) प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
अहवालात काय निष्पन्न झाले?
प्रयोगशाळेच्या अहवालात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अगरबत्त्यांमध्ये 'डायमेफ्लुथ्रिन' नावाचे कीटकनाशक आढळले असून, या रसायनाचा अगरबत्तीमध्ये वापर करण्यासाठी कोणतीही अधिकृत मान्यता नाही. हे रसायन मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
कठोर कारवाईचे आदेश
या अहवालानंतर महाराष्ट्र कृषी संचालकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे:
विक्रीवर बंदी: 'कम्फर्ट' आणि 'स्लीप वेल' या उत्पादनांची विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल: कीटकनाशक कायदा १९६८ आणि कीटकनाशक नियम १९७१ अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यव्यापी छापे: राज्यभरात अशा अवैध अगरबत्त्यांचा साठा जप्त करण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकून दोषी उत्पादक आणि वितरकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्यावर काय परिणाम?
तज्ज्ञांच्या मते, मान्यता नसलेल्या कीटकनाशकांचा धूर श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांची जळजळ, त्वचा रोग आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास रक्तदाब (High BP) वाढण्यासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
तुम्ही जर डास प्रतिबंधक अगरबत्ती खरेदी करत असाल, तर त्यावर CIBRC (Central Insecticides Board and Registration Committee) नोंदणी क्रमांक आहे का? याची खात्री नक्की करा. नोंदणी क्रमांक नसलेल्या अगरबत्त्या बेकायदेशीर असू शकतात, ज्यांच्या वापरामुळे तुमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.