वडिलांच्या शौर्याची जमीन शोधणे पडले महागात... डॉक्टरला सव्वा कोटींचा गंडा...

Share:
Main Image
Last updated: 11-Apr-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) ११ एप्रिल - भारतीय लष्करातील वडिलांच्या सेवेबद्दल शासनाकडून मिळालेल्या जमिनीचा शोध घेऊन देण्याच्या बहाण्याने, मुंबईतील एका सेवानिवृत्त डॉक्टरला तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडिलांच्या 'त्या' जमिनीचा घेतला गैरफायदा
मूळचे निफाड तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ. वीरेंद्र पंडित खडताळे (६६, रा. बोरिवली, मुंबई) हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांच्या उल्लेखनीय कामकाजामुळे शासनाकडून त्यांना निफाड तालुक्यातील कुरडगाव येथे जमीन बहाल करण्यात आली होती. मात्र, ताबा न घेतल्याने ही जमीन नेमकी कुठे आहे आणि त्याची कागदपत्रे कशी मिळवायची, याची माहिती खडताळे कुटुंबाला नव्हती. हीच बाब संशयितांच्या पथ्यावर पडली.

असा रचला फसवणुकीचा सापळा
२०२२ मध्ये डॉ. खडताळे यांची भेट निलीमा खडताळे, दीपा हांडोरे व विशाल हांडोरे यांच्याशी झाली. संशयितांनी डॉ. खडताळे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली आणि त्यांचा विश्वास संपादन केला. "तुमच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन शोधून देतो आणि त्यावरील अतिक्रमण काढून ताबा मिळवून देतो," असे आमिष त्यांनी दाखवले. नाशिक रोड येथील बिटको पोलीस चौकी परिसरात या भेटीगाठी झाल्या होत्या.

Advertisement

दोन वर्षांत उकळले १ कोटी १५ लाख
जमिनीचा शोध घेणे, सरकारी कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे, अशा विविध कारणांसाठी संशयितांनी गेल्या दोन वर्षांत डॉ. खडताळे यांच्याकडून वेळोवेळी एकूण १ कोटी १५ लाख रुपये उकळले. मात्र, इतकी मोठी रक्कम देऊनही जमिनीचा पत्ता लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी डॉ. वीरेंद्र खडताळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी निलीमा खडताळे, दीपा हांडोरे आणि विशाल हांडोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही केली जात आहे.

जमिनीचे व्यवहार करताना किंवा सरकारी कागदपत्रांच्या नावाखाली मोठ्या रकमांची मागणी करणाऱ्या व्यक्तींची अधिकृत खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.