मुंबई, (प्रतिनिधी) ११ एप्रिल - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पर्यटन विभागातर्फे १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी विशेष ‘टूर सर्कीट सहली’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नाशिक आणि नागपूर या शहरांमधील बाबासाहेबांच्या स्मृतींनी पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची ही संधी पर्यटकांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी पुढाकार
डॉ. बाबासाहेबांचे कार्य, जीवनचरित्र आणि त्यांचे महान विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सहलीच्या माध्यमातून केवळ प्रवासच होणार नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे केंद्र राहिलेल्या स्थळांचा समृद्ध इतिहास जवळून अनुभवता येईल, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
असे असेल 'टूर सर्कीट'चे नियोजन:
मुंबई: चैत्यभूमी (दादर), राजगृह, प्रिंटिंग प्रेस, बी.आय.टी. चाळ (परळ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) आणि सिद्धार्थ महाविद्यालय (फोर्ट).
नाशिक: मुक्तीभूमी (येवला), त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर.
नागपूर: दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय (चिंचोली) आणि ड्रॅगन पॅलेस (कामठी).
मिळणाऱ्या सुविधा आणि नियम:
१. निःशुल्क प्रवेश: सहलीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर बसमध्ये प्रवेश मिळेल.
२. प्रवास व मार्गदर्शन: सहलीसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत अनुभवी मार्गदर्शक (Guide), अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल.
३. वेळ: १३ व १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सहलीची सुरुवात होईल.
प्रमुख केंद्रावरून होणार सुरुवात:
मुंबईत चैत्यभूमी येथून, नाशिकमध्ये गडकरी चौक येथून तर नागपुरात दीक्षाभूमी येथून या सहली मार्गस्थ होतील. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आणि पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी या उपक्रमाचे सखोल नियोजन केले असून, या ऐतिहासिक सहलीमुळे समतेचा संदेश सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सहलीसाठी येथे संपर्क साधा:
मुंबई: पवन पवार (7666603211), सूरज चतुर्वेदी (8108175530)
नाशिक: तुषार शिंदे (9890255157), ऋषिकेश चव्हाण (8806841468)
नागपूर: अविनाश गजघाटे (9823111203)