मुंबई, (प्रतिनिधी) ११ एप्रिल - मुंबईतील शिधावाटप यंत्रणेने अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवून सुमारे ४० लाख ६१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागरी पुरवठा नियंत्रक, शिधावाटप व संचालक चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डोंगरी परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.
डोंगरी परिसरात रचला सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, वाडीबंदर ब्रीज आणि डोंगरी परिसरात अवैध गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार होती. या माहितीची शहानिशा करून उपनियंत्रक गणेश बेल्लाळे आणि माधुरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. या मोहिमेत अवैध गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ८ गाड्या पकडण्यात आल्या असून, त्यामधील ४५१ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
काळाबाजार खपवून घेणार नाही: चंद्रकांत डांगे
या कारवाईबाबत माहिती देताना संचालक चंद्रकांत डांगे म्हणाले, "जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. सर्वसामान्यांच्या हक्काच्या वस्तूंवर गदा आणणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर मोहीम भविष्यातही सुरू राहील."
कारवाई पथकाची कामगिरी
स. शि. अ. प्रदीप यादव यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या पथकात भूपेंद्र गवळी, महेश देशपांडे, राहुल साळुंखे, अभिजीत गोराणे, विश्वजित गडकरी यांच्यासह सचिन बोरसे, अनिकेत जवळकर, विकास उभे व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. शिधावाटप यंत्रणेच्या या मोठ्या कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.