१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर... आता हे प्रमाणपत्र...

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० एप्रिल - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमधील त्रुटी दूर करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे शिबिर दि. ११ आणि १३ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. समितीचे संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती दिली असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

कोणासाठी आहे हे शिबिर?
ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सेवा किंवा निवडणूक कारणांसाठी जात पडताळणीसाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांच्या अर्जात काही त्रुटी असल्याने प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा सर्वांसाठी हे शिबिर महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने:
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
ज्यांना 'CCVIS-II' प्रणालीद्वारे ईमेलवर त्रुटी कळवण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप पूर्तता केलेली नाही.

Advertisement

अर्जाची पूर्तता प्रत्यक्ष होणार
या विशेष मोहिमेअंतर्गत अर्जदारांना दि. ११ आणि १३ एप्रिल रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. समितीच्या अधिकाऱ्यांसमक्ष त्रुटींची पूर्तता करून आपले अर्ज वैध करून घेण्याची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्रयस्थ व्यक्तींपासून सावध राहा!
"जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कामासाठी कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्ती किंवा मध्यस्थांशी संपर्क साधू नये. कुणाच्याही अमिषाला बळी न पडता थेट समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा," असे आवाहन संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.

शिबिर तपशील:
दिनांक: ११ व १३ एप्रिल २०२६
वेळ: कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायंकाळी ६)
ठिकाण: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, नाशिक.

Comments

No comments yet.