युवकांना इंटर्नशिपची सुवर्णसंधी... २ हजार कंपन्या, २१७ जागा... दरमहा मिळणार ५ हजार...

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १० एप्रिल - देशातील तरुण पिढीला उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी २१७ जागा उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांनी तातडीने ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.

आर्थिक पाठबळ आणि औद्योगिक अनुभव
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला (इंटर्न) सुरुवातीला कामावर रुजू होताना ६ हजार रुपये एकरकमी दिले जातील. त्यानंतर पुढील ९ महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ५ हजार रुपये (४५०० केंद्र सरकारकडून आणि ५०० रुपये संबंधित कंपनीकडून) विद्यावेतन दिले जाणार आहे. यामुळे युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेताना आर्थिक ओढग्रस्त सोसावी लागणार नाही.

पात्रता आणि अटी
वयोमर्यादा: २१ ते २४ वर्षे.
शिक्षण: ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे किंवा जे सध्या बेरोजगार आहेत, असे युवक-युवती पात्र असतील.
कालावधी: ५ वर्षांत १ कोटी तरुणांना संधी देण्याचे उद्दिष्ट असून, सध्या १२ महिने कालावधीची इंटर्नशिप दिली जाणार आहे.

Advertisement

२ हजार कंपन्यांशी करार
केंद्र सरकारने देशभरातील सुमारे २ हजार नामवंत कंपन्यांसोबत या योजनेसाठी करार केला आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींना मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र युवकांनी ही संधी वाया न घालवता आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य कंपनीत अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. अर्जाबाबत काही शंका किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्ह्याच्या ०२४१-२९९५७३५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

"अहिल्यानगरमधील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेत सहभागी होऊन औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा, जेणेकरून भविष्यातील रोजगाराच्या संधी सुलभ होतील."
— रविकुमार पंतम, सहायक आयुक्त.

Comments

No comments yet.