नाशिकचा लातूरवर दिमाखदार विजय... सलामीवीर रसिका शिंदेचे झंझावाती नाबाद दीडशतक...

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० एप्रिल - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या (इन्व्हिटेशन लीग) साखळी क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या संघाने आपल्या विजयाचा धडाका कायम राखला आहे. सलामीवीर रसिका शिंदे हिच्या १५९ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर नाशिकने लातूरचा २३१ धावांनी धुव्वा उडवला.

नाशिकचा धावांचा डोंगर
'एसएसके' क्रिकेट मैदानावर झालेल्या या एकदिवसीय सामन्यात नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या रसिका शिंदेने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत लातूरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिने अवघ्या १४२ चेंडूंमध्ये २० चौकार आणि एका उत्तुंग षटकारासह नाबाद १५९ धावा कुटल्या. रसिकाच्या या घणाघाती खेळीमुळे नाशिकने ५० षटकांत ५ गडी गमावून ३०२ धावांचा डोंगर उभा केला.

लातूरचा डाव ७१ धावांत गारद
३०३ धावांचे विशाल लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लातूरच्या संघाला नाशिकच्या भेदक गोलंदाजीसमोर तग धरता आला नाही. नाशिकची गोलंदाज पूजा वाघ हिने टिच्चून मारा करत लातूरचे ४ फलंदाज माघारी धाडले. तिला वैभवी बालसुब्रमणीयम (२ बळी), शाल्मली क्षत्रिय आणि प्रियांका घोडके (प्रत्येकी १ बळी) यांनी उत्तम साथ दिली. परिणामी, लातूरचा संपूर्ण संघ ३२ षटकांत अवघ्या ७१ धावांवर आटोपला आणि नाशिकने २३१ धावांनी मोठा विजय नोंदवला.

Advertisement

इतर सामन्यांचे निकाल:
सांगलीचा सलग चौथा विजय:
'क्रीडक' मैदानावर झालेल्या सामन्यात सांगलीने सी.डी.ए. पुणे संघावर ९ गडी राखून सहज विजय मिळवला. पुण्याने दिलेल्या १२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सांगलीची कर्णधार कृषी ठक्कर हिने नाबाद ६१ धावा केल्या आणि गोलंदाजीत ३ बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. तिला भावी पुनमिया (३ बळी) आणि सरस्वती कोकरे (३ बळी व नाबाद २० धावा) यांची मोलाची साथ लाभली.

उस्मानाबादची 'चंद्रोस' पुणेवर मात:
'मेरी' क्रिकेट मैदानावर उस्मानाबादने प्रथम फलंदाजी करताना पायल पवार (६२), कर्णधार समृद्धी डाले (५१) आणि मृदुला आचार्य (नाबाद ४१) यांच्या जोरावर २४२ धावा केल्या. पुण्याच्या प्रियांका सांगवानने ४ आणि साईश्री बनसोडेने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात शरण्या लांडगे (५९) आणि गौरी अहिरे (५३) यांनी झुंजार खेळी केली, मात्र दोघीही धावबाद झाल्याने चंद्रोस पुणेचा संघ ४० धावांनी पराभूत झाला.

"नाशिकच्या खेळाडूंची ही कामगिरी कौतुकास्पद असून रसिका शिंदेचे दीडशतक या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले आहे."
— समीर रकटे, सेक्रेटरी, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.

Comments

No comments yet.