कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपले अन् चोरट्यांनी खालचा मजला साफ केला... सिडकोतील घटना...

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० एप्रिल - नाशिक शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, सिडको परिसरातील एका घरातून तब्बल १० लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे, कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी तळमजला साफ केला. याचसोबत शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जबरी चोरीच्या घटना घडल्या असून यात तरुणीसह एका युवकाला लक्ष्य करण्यात आले.

सिडकोत साडे दहा लाखांचा ऐवज लंपास
सिडकोतील त्रिमुर्ती चौक परिसरातील शिवशक्तीनगरमध्ये ही मोठी चोरी झाली. विजय बाळासाहेब घोटेकर यांचे जोगेश्वरी मेडिकलजवळ दुमजली घर आहे. बुधवारी (दि. ८) रात्री घोटेकर कुटुंबीय तळमजल्यावरील घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधत तळमजल्याच्या घराचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. कपाटातील ८० हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक पडोळकर पुढील तपास करत आहेत.

रस्त्यावर तरुणीचा मोबाइल हिसकावला
दुसरी घटना पाथर्डी गाव परिसरात घडली. दिया सोमनाथ पाबळे (१८) ही तरुणी बुधवारी वडनेर-पाथर्डी मार्गाने मोबाईलवर बोलत पायी जात होती. यावेळी यश मेडिकलजवळ मोपेडवरून आलेल्या एका अज्ञात भामट्याने क्षणार्धात तिच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून हवालदार देवरे तपास करत आहेत.

Advertisement

दारूसाठी पैसे नाकारले म्हणून परिचितानेच लुटले
सातपूर औद्योगिक वसाहतीत एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गौतम मधुकर भालेराव हा युवक गोल्डी कंपनी परिसरातून जात असताना, त्याचा परिचित संशयित श्रावण साळवे याने त्याला अडवले.

साळवेने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली, मात्र भालेरावने नकार दिल्याने संतापलेल्या साळवेने त्याच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेतला आणि तेथून पळ काढला. 

सातपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हवालदार वाघमारे तपास करत आहेत.

शहरात मोबाइल हिसकावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, रस्त्याने चालताना मोबाइलचा वापर टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच घर बंद असताना सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

Comments

No comments yet.