येवला मतदारसंघातील सिंचन क्षेत्रात होणार वाढ...

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

येवला, निफाड, (प्रतिनिधी) १० एप्रिल- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात १ कोटी २५ लाख रुपये निधीतून सहा बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे बंधाऱ्यांची गळती रोखली जाणार असून सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. सदर दुरुस्तीची कामे जलसंधारण विभाग जिल्हा परिषद, नाशिक मार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षात ही कामे हाती घेण्यात येणार असून संबंधित विभागाने तांत्रिक मान्यताही प्रदान केली आहे. या निधीतून विविध गावांतील बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील नगरसूल बंधारा दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये, महालखेडा (पा.) काळधोडी नदीवरील बंधाऱ्यासाठी १५ लाख रुपये, बोकटे बंधाऱ्यासाठी २० लाख रुपये, अंगुलगाव बंधाऱ्यासाठी २० लाख रुपये, तसेच उंदीरवाडी पाझर तलाव दुरुस्तीसाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच निफाड तालुक्यातील गोंदेगाव गोळेगाव गोई नदीवरील बंधारा क्रमांक ७ च्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामांमुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांना कामे तातडीने सुरू करून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामामुळे शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

प्रतिक्रिया

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील ६ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात येतील. यामाध्यमातून सिंचनात वाढ होऊन शेतकरी बांधवांना मोठा फायदा मिळेल. मतदारसंघातील सिंचन क्षेत्रात अधिक वाढ करण्यास आपले प्रयत्न सुरू असून अजूनही विविध कामांसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.

-माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.