रिसॉर्टवर अत्याचार अन व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग...  सामूहिक अत्याचार आणि धर्मांतराची सक्ती... नाशिकच्या त्या आयटी कंपनीतील धक्कादायक बाबी उघड...

Share:
Main Image
Last updated: 09-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ एप्रिल - नाशिक शहर गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी हादरून गेले आहे. अशोक खरात आणि रवींद्र एरंडे यांची प्रकरणे ताजी असतानाच, आता एका नामांकित आयटी कंपनीतील तरुणींचे नियोजित पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी सहा नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

नोकरीचे आमिष आणि ब्लॅकमेलिंगचे जाळे
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणींना आपले लक्ष्य केले होते. "आमच्यामुळेच तुला नोकरी मिळाली आहे," असे भासवून आरोपी तरुणींवर मानसिक दबाव निर्माण करत असत. सुरुवातीला पार्ट्या आणि विविध प्रलोभने दाखवून विश्वास संपादन केला जायचा आणि त्यानंतर पीडित तरुणींचे शोषण सुरू व्हायचे.

आरोपी तरुणींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने विविध रिसॉर्ट्सवर नेत असत. तिथे त्यांच्यावर अत्याचार केल्यानंतर त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले जायचे. हे नराधम एवढ्यावरच न थांबता, आपल्या मित्रांनाही या कृत्यात सामील करून घेत साखळी पद्धतीने तरुणींचे शोषण करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Advertisement

धर्मांतरासाठी सक्ती आणि मानसिक छळ
या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे पीडित तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता. पीडितांना नमाज पठण करण्यास सांगणे, मांस खाण्यास भाग पाडणे, उपवास धरायला लावणे आणि हिजाब घालण्याची सक्ती करणे, असे गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

सहा आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणी वेगाने चक्रे फिरवत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. बुधवारी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस तपास सुरू:
या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का? आणि आतापर्यंत किती तरुणी या नराधमांच्या जाळ्यात अडकल्या आहेत? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक समोर येणाऱ्या या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

No comments yet.