नकली साप-वाघाची भीती अन् 'द्रव्ययुक्त' पेढे... भोंदू खरातच्या पापांचा पाढा न्यायालयात उघड...

Share:
Main Image
Last updated: 09-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ एप्रिल - नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापांचा घडा आता भरत चालला असून, सत्र न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात आज ही सुनावणी पार पडली. यापूर्वीच्या दुसऱ्या गुन्ह्यातील सात दिवसांची कोठडी संपल्यानंतर खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सरकारी वकिलांचा रोखठोक युक्तिवाद
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या कस्टडीसाठी भक्कम मुद्दे मांडले. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की:
आरोपी नकली साप आणि वाघाचा धाक दाखवून भाविकांना घाबरवत असे.
एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. हा 'विधी' नेमका कोणता होता, याचा तपास करणे आवश्यक आहे.
महिलांना गुंगीकारक 'द्रव्ययुक्त पेढे' खायला देऊन खरात त्यांचे लैंगिक शोषण करत असे. हे द्रव्य तो कुठून मिळवत होता, याचा शोध घेणे बाकी आहे.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला पेनड्राइव्ह आणि लॅपटॉपमधील डेटाच्या आधारे आरोपीला समोर बसवून सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
खरात अत्यंत चलाख असून तपासात सहकार्य करत नसल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचे वकिलांनी नमूद केले.

Advertisement

बचाव पक्षाचा दावा
खरातचे वकील सचिन भाटे यांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटी (SIT) करत आहे. नकली साप, खडे हे मुद्दे आधीच्या गुन्ह्यांमध्येही आले आहेत. पेनड्राइव्ह रिकव्हरी आणि गुन्ह्याचा कालावधी यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "एकाच प्रकारच्या तपासासाठी पुन्हा पुन्हा कोठडीची गरज काय?" असा युक्तिवाद त्यांनी केला.

न्यायालयाचा निर्णय
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने अशोक खरातला १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी खरातला "तुम्हाला काही सांगायचे आहे का?" असे विचारले असता, त्याने हात जोडून "नाही" असे उत्तर दिले.

तपासाधिकारी अमोल भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट केले. या प्रकरणात एका पीडित महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे खरातचे हे मोठे कांड उघडकीस आले असून, आता अनेक महिला तक्रारीसाठी पुढे येत आहेत.

Comments

No comments yet.