नाशिक, (प्रतिनिधी) ८ एप्रिल - ज्यांच्या खांद्यावर शोरूमची जबाबदारी होती, त्यांनीच शोरूमला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. जनरल वैद्यनगर भागातील एका इलेक्ट्रिक बाईक शोरूममधील व्यवस्थापक (मॅनेजर) आणि सेल्स कमांडो यांनी मिळून दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या दोन इलेक्ट्रिक दुचाकी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश अभिजीत कलंत्री यांचे जनरल वैद्यनगर भागातील कॅमल हाऊसच्या पाठीमागे 'आरकेएस ग्रीन ऑटो' नावाचे इलेक्ट्रिक बाईकचे शोरूम आहे. या शोरूममध्ये संशयित आरोपी कामाला होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत शोरूममधील स्टॉकची तपासणी केली असता, दोन महागड्या इलेक्ट्रिक बाईक गायब असल्याचे मालकाच्या निदर्शनास आले. सखोल चौकशी अंती, शोरूममधील कर्मचाऱ्यांनीच संगनमत करून या गाड्या चोरल्याचे समोर आले.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
याप्रकरणी ऋषिकेश कलंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१. फरदीन नईम शेख (व्यवस्थापक)
२. आनंद उदावंत (सेल्स कमांडो)
३. पार्थ खोडे (कर्मचारी)
२ लाखांचा मुद्देमाल लंपास
संशयितांनी आपापसात संगनमत करून शोरूममध्ये कार्यरत असताना सुमारे २ लाख ८ हजार २६६ रुपये किमतीच्या दोन इलेक्ट्रिक बाईक चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. विश्वासू कर्मचाऱ्यांनीच अशा प्रकारे हातसाफ केल्याने व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कुलथे करत आहेत. चोरीला गेलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावली की त्या हस्तगत केल्या जाणार, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.