नाशिक, (प्रतिनधी) ८ एप्रिल - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पाहणी दरम्यान दिलेल्या निर्देशानुसार त्र्यंबकेश्वर तेथील विविध पायभूत सुविधा विकास कामांना अधिक गती देण्याच्या सूचना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, भूसंपादन अधिकारी महेश जमदाळे, नगरपालिका शाखेचे सह आयुक्त शाम गोसावी, नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञा.न.मुठाळ, तहसीलदार मकरंद दिवाकर, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त सिंह यांनी यावेळी त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ, भाविकांसाठीच्या पायाभूत सुविधा, वाहनतळ, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच विद्युत सुविधा या महत्त्वाच्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला. दर्शनपथ प्रकल्पासाठी जमीन संपादन व जमीन मूल्यांकन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. युटिलिटी शिफ्टिंग अंतर्गत पाणीपुरवठा व विद्युत लाईनची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. तसेच, सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ना हरकत दाखला प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, सुशोभीकरण व भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचना देत संबंधित विभागांनी आवश्यक अतिरिक्त निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सर्व संबंधित यंत्रणांशी संवाद साधून परस्परांकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या व इतर विषयांची माहिती घेत संबंधित विभागांनी समन्वयाने व वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.
?s=20