नाशिकमध्ये चोरट्यांचा उच्छाद... मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या... तीन गुन्हे दाखल...

Share:
Main Image
Last updated: 07-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, चोरट्यांनी आता विवाह सोहळे, रिक्षाप्रवास आणि चक्क बंद घरांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये वृद्ध महिलेचे दागिने, रिक्षातील प्रवाशाची बॅग आणि बंद घरातील पर्स लांबवल्याचे प्रकार समोर आले आहेत.

लग्नाच्या गडबडीत पाच तोळ्यांची पोत चोरीला 
विवाह सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेची पर्स लांबवल्याची घटना छत्रपती संभाजीनगर रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे घडली. शकुंतला उत्तमराव पाटील (७६, रा. पंचवटी) या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्या होत्या. ओळखीच्या महिलांशी गप्पा मारण्यात त्या दंग असताना चोरट्यांनी त्यांची बाजूला ठेवलेली पर्स पळविली. या पर्समध्ये *पाच तोळे वजनाची सोन्याची पोत* आणि मोबाईल असा मोठा ऐवज होता. आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Advertisement

रिक्षाचालकानेच लांबविले ६३ हजारांचे दागिने
दुसरी घटना सिडको भागात घडली असून, एका रिक्षाचालकानेच महिलेच्या विश्वासाला तडा दिला आहे. गोकुळाबाई युवराज गुजर (रा. पाथर्डी फाटा) या सोमवारी सकाळी बाहेरगावी जाण्यासाठी पवननगर ते निमाणी बसस्थानक असा रिक्षाने प्रवास करत होत्या. यावेळी चालक महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधत सीटखाली ठेवलेली त्यांची बॅग उघडून त्यातील *सोन्याचे मंगळसूत्र, नथ आणि मुरणी* असा ६३ हजारांचा ऐवज चोरून नेला. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हवालदार ठुबे पुढील तपास करत आहेत.

खिडकीतून 'बांबू' घालून पर्सची चोरी
धात्रक फाटा परिसरात चोरट्यांची एक अजब शक्कल समोर आली आहे. मयुरी प्रतीक वाघ या सायंकाळी भाजीपाला घेण्यासाठी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीतून बांबूच्या साहाय्याने सोफ्यावर ठेवलेली पर्स ओढून काढली. विशेष म्हणजे, पर्समधील ३० हजार रुपये किमतीची दोन मंगळसूत्रे काढून घेतल्यानंतर चोरट्यांनी रिकामी पर्स शेजारील रो-हाऊसच्या वॉल कंपाउंडला टांगून दिली. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार चव्हाण या अनोख्या चोरीचा तपास करत आहेत.

नागरिकांनो सावधान
 लॉन्स/मंगल कार्यालय: सार्वजनिक ठिकाणी आपली बॅग किंवा दागिने सोडून गप्पांमध्ये दंग होऊ नका.
 रिक्षाप्रवास: प्रवासादरम्यान आपली बॅग सीटखाली ठेवण्याऐवजी स्वतःजवळ किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा.
 घराची सुरक्षितता: घराबाहेर पडताना खिडक्या व्यवस्थित लावून घ्या, विशेषतः खिडकीजवळ मौल्यवान वस्तू ठेवणे टाळा.

Comments

No comments yet.