येवला शहरातील अग्निशामक कर्मचाऱ्यांना मिळणार निवासस्थान... बांधकामाला मिळाली प्रशासकीय मान्यता

Share:
Main Image
Last updated: 07-Apr-2026

येवला, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - येवला शहरातील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून येवला नगरपरिषद हद्दीतील अग्निशामक कर्मचारी निवासस्थानाच्या ४ कोटी ८४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन कर्मचाऱ्यांना हक्काचे निवासस्थान मिळणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या प्रयत्नांतून येवला नगरपरिषदेकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जिल्हा नियोजन समिती योजनेतून येवला नगरपालिका अग्निशामक केंद्र जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज व सुरक्षित निवासस्थान उभारण्यात येणार आहे.

अग्निशामक दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास तत्पर असणारे महत्त्वाची यंत्रणा आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्राजवळच राहण्याची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन या निवासस्थानाच्या प्रकल्पाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे अग्निशामक कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज व सोयीस्कर निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे. परिणामी, येवला शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement

छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असून, या निर्णयामुळे शहराच्या आपत्कालीन सेवा व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. या कामामुळे येवला शहराच्या सर्वांगीण विकासाला आणखी गती मिळणार आहे.

प्रतिक्रिया

आपत्कालीन सेवेत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी अग्निशामक केंद्राजवळ कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. येवला शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना सुसज्ज व सुरक्षित असे निवासस्थान मिळणार आहे. येवला शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

-माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.