नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - नाशिक शहरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या ४८ तासांत झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये तीन जणांचा बळी गेला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मध्यप्रदेशातील एका तरुण उंटचालकाचा मृत्यू झाला, तर म्हसरूळ परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले. तिसऱ्या घटनेत दुचाकीवरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
उंट घेऊन जाणाऱ्या तरुणाला हायवेवर काळ नडला
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे शिवारात रविवारी (दि. ५) रात्री उशिरा हा अपघात झाला. जितेंद्र श्रावण बाबर (वय २०, रा. पोखराबाद, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हा तरुण आपले उंट घेऊन पुण्याकडून नाशिकच्या दिशेने पायी येत होता.
हॉटेल 'पंढरीचा राजा' परिसरात मागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. यात जितेंद्र गंभीर जखमी झाला. त्याचा मित्र युवराज बाबर याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार मोरे तपास करत आहेत.
मखमलाबादमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
दुसरी घटना सोमवारी (दि. ७) सकाळी मखमलाबाद परिसरातील लिलावती हॉस्पिटल समोर घडली. शांतीनगर भागात राहणारे केशवराव जिवलाजी बागुल (वय ६५) हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरी परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बागुल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला आहे. रविंद्र बागुल यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक बळवंत गावीत अधिक तपास करत आहेत.
दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने महिलेचा मृत्यू
पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात घडली. उज्ज्वला सीताराम गायकवाड (वय ५५, रा. अष्टगंधा सोसायटी, जुईनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
रविवारी (दि. ५) त्या पतीसोबत दुचाकीवरून (MH 15 GM 2491) जात असताना अचानक पाठीमागून त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार गोसावी या प्रकरणाचा तपास करत आहेत.