नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - नाशिक शहर पोलीस दलाच्या श्वान पथकातील (डॉग स्क्वॉड) अत्यंत हुशार आणि कर्तव्यनिष्ठ मानल्या जाणाऱ्या 'निता' या श्वानाने आपल्या १० वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ३१ मार्च रोजी निवृत्ती घेतली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात निताचा यथोचित सत्कार करून तिला सन्मानाने निरोप देण्यात आला.
गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ
सन २०१६ मध्ये नाशिक शहर पोलीस दलात दाखल झालेल्या निताने आपल्या सेवाकाळात तब्बल ४८० गुन्ह्यांच्या घटनास्थळी उपस्थित राहून तपासाला दिशा दिली. अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात आणि गुन्हेगारांना प्रत्यक्ष न्यायालयापर्यंत खेचून शिक्षा मिळवून देण्यात तिची भूमिका निर्णायक ठरली आहे. तिच्या या अचाट कामगिरीमुळे तिला पोलीस दलातील एक 'योद्धा' म्हणून ओळखले जाते.
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव
पुणे येथील शिवाजीनगर येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर निताने २०१७ आणि २०१८ मधील पोलीस कर्तव्य मेळाव्यात आपली चुणूक दाखवली होती. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे आयोजित 'अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा' (AIPDM) मध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र राज्याला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला होता.
आरोग्याची विशेष निगा
निताच्या प्रकृतीची आणि आरोग्याची काळजी घेण्यामध्ये डॉ. प्रियांका जोपूळकर, डॉ. संदीप पवार, डॉ. किरण जाधव, डॉ. वैशाली थोरात यांच्यासह सुनील गायकवाड, अनिल पगारे आणि पोलीस डॉग युनिटचे प्रमुख श्री. कोल्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वयोमानानुसार १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने निता आता पोलीस दलातून निवृत्त झाली आहे.
यावेळी नाशिककरांच्या वतीने तिच्या उल्लेखनीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली असून, तिच्या पुढील उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पोलीस दलातील एक अभेद्य कणा निवृत्त झाल्याची भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.