विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या स्कूलबसवर हल्ला... पंचवटी मधील धक्कादायक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 07-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - शहरातील मखमलाबाद रोडवरील चंद्रमा हॉस्पिटल परिसरात एका रिक्षातील टोळक्याने स्कूल बस अडवून चालक आणि क्लिनरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहनाखाली कुत्रा आल्याच्या कारणावरून हा वाद झाला असून, या हल्ल्यात बसचा क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधुत अरुण चिंतामणी (रा. सिग्नेचर हाईट्स, कलानगर, म्हसरूळ) हे सोमवारी (दि. ६) सायंकाळच्या सुमारास एमएच १५ इएफ ०८८४ या स्कूल बसने म्हसरूळ भागातील क्लासेसचे विद्यार्थी घेऊन कॅनडा कॉर्नरकडे जात होते. कुमावतनगर पाटा जवळ बससमोर अचानक एक कुत्रा आडवे आले. त्यानंतर बस पुढे मखमलाबाद रोडवरील चंद्रमा हॉस्पिटल परिसरात पोहोचली असता, पाठीमागून आलेल्या एमएच १५ जेए ३५८१ या रिक्षातील तिघांनी बसची वाट अडविली.

Advertisement

वजनी वस्तूने केला हल्ला
"तुमच्या बसखाली कुत्रा मेला," असा आरोप करत रिक्षातील टोळक्याने बसचे चालक मच्छिंद्र पंढरीनाथ आहिरे आणि क्लिनर चिंतामणी यांना खाली खेचले. यावेळी संतापलेल्या तरुणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले आणि एका संशयिताने चिंतामणी यांच्या डोक्यात वजनी वस्तू मारल्याने ते रक्तबंबाळ होऊन जखमी झाले.

पोलीस तपासात वेग
भररस्त्यात स्कूल बस अडवून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी अवधुत चिंतामणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस जमादार शेळके करत आहेत.

विद्यार्थी असतानाच घडला प्रकार
 ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी बसमध्ये विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने विद्यार्थ्यांनी कोणताही इजा झाली नसली तरी, या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Comments

No comments yet.