दिंडोरी अपघात प्रकरणी अखेर चौकशी समिती नियुक्त... अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश...

Share:
Main Image
Last updated: 07-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - दिंडोरी नगरपंचायत हद्दीत ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री झालेल्या भीषण अपघाताची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या अपघातात इंदोरे, ता. दिंडोरी येथील दरगोडे कुटूंबातील 6 शालेय विद्यार्थासह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा सर्वंकष तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणची परिस्थिती, कामाची पद्धत, सुरक्षा उपाययोजना, तसेच प्रशासनिक जबाबदाऱ्या यांचा तपशीलवार आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीस देण्यात आले आहेत.

चौकशी समितीची रचना पुढीलप्रमाणे आहे :

Advertisement

अभिजीत कदम – मुख्याधिकारी, सिन्नर नगरपरिषद (अध्यक्ष)
यशवंत पाटील – कार्यकारी अभियंता, न.पा. प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (सह-अध्यक्ष)
रेखा विश्वकर्मा – सहाय्यक आयुक्त, न.पा. प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (सदस्य)
रवींद्र चव्हाण – सहाय्यक संचालक, नगर रचना विभाग, नाशिक (सदस्य)
विनोद जगताप – रचना सहाय्यक, सिन्नर नगरपरिषद (सदस्य सचिव)

या समितीने अपघातस्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे, संबंधित अधिकारी व कामगारांचे निवेदन नोंदवणे, तसेच कामाच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. यासोबतच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारीही समितीवर सोपविण्यात आली आहे. समितीने आपला सविस्तर अहवाल ७ दिवसांच्या आत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. तसेच संबंधित नगरपंचायतीने या चौकशीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, नोंदी व सहकार्य उपलब्ध करून द्यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

सदरची समिती शाम गोसावी, जिल्हा सह आयुक्त,  नगरपालिका प्रशासन,  जिल्हाधिकारी कार्यालय,  नाशिक यांच्या देखरेख, सनियंत्रण व मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आल्याचेही आदेशात म्हटले आहेत.

Comments

No comments yet.