दिंडोरीत गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात... या बिलासाठी मागितली ५२ हजारांची लाच...

Share:
Last updated: 07-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - दिंडोरी पंचायत समितीमधील शिक्षण विभागात भ्रष्टाचार उघड झाला असून, वेतनश्रेणीच्या थकबाकीचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. यात दिंडोरीचे गट शिक्षणाधिकारी, एक प्राथमिक शिक्षक आणि जिल्हा परिषदेचे कनिष्ठ लेखा अधिकारी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर झाली कारवाई:
१) भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (वय ४८) - गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती दिंडोरी.
२) निलेश निंबा भारती (वय ५०) - प्राथमिक शिक्षक, निगडोळ, ता. दिंडोरी.
३) देवीप्रसाद चैत्राम पाटील (वय ५०) - कनिष्ठ लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

काय आहे प्रकरण?
यातील तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षक असून पेसा क्षेत्रात कार्यरत आहेत. सन २००२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील त्यांच्या वेतनश्रेणीची थकबाकीची बिले (अंदाजे ६ लाख ५७ हजार आणि ६ लाख ५५ हजार रुपये) मंजूर करण्यासाठी त्यांनी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता. ही बिले जिल्हा परिषद नाशिक येथे मंजुरीसाठी पाठवण्याच्या मोबदल्यात संशयित आरोपींनी लाचेची मागणी केली होती.

Advertisement

अशी झाली लाचेची मागणी:
तपासात समोर आले की, सुरुवातीला बिलाच्या एकूण रकमेच्या ९ टक्के लाचेची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर ही रक्कम ३ टक्के (५२,००० रुपये) ठरवण्यात आली. गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी ही रक्कम स्वीकारली, तर शिक्षक निलेश भारती यांनी मध्यस्थी केली. तसेच, जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद पाटील यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

एसीबीचा सापळा:
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. या कारवाईत तिन्ही आरोपींनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोलीस हवालदार विनोद चौधरी आणि पोलीस नाईक अनिल गांगोडे यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet.