नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - सातपूरचा खरात अशी ओळख असलेला तोतया पत्रकार रवींद्र गणपत एरंडे याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पापुद्रे उलगडू लागले आहेत. एरंडेच्या कार्यालयात केवळ अश्लील व्हिडिओच नव्हे, तर चक्क प्राण्यांचे अवयवही सापडल्याचा खळबळजनक दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. या प्रकारामुळे परिसरात जादूटोणा केला जात असल्याचा संशय बळावला असून, न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे.
संशयित रवींद्र एरंडे याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बारी यांनी तपासातील प्रगतीबाबत माहिती दिली. पोलिसांच्या तपासात आतापर्यंतच्या झडतीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
१२० अश्लील व्हिडिओ आणि सात महिला
पोलिसांनी जप्त केलेल्या पेनड्राइव्हच्या तांत्रिक तपासणीत तब्बल १२० अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये किमान सात वेगवेगळ्या महिलांचे चित्रण असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमधील महिला नेमक्या कोण आहेत, त्यांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एरंडेच्या कार्यालय आणि घराच्या झडतीदरम्यान पोलिसांना प्राण्यांचे काही अवयव मिळून आले आहेत. तोतया पत्रकारितेच्या नावाखाली एरंडे जादूटोणा किंवा तत्सम अघोरी कृत्ये करत होता का? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अवयवांचा वापर कशासाठी केला जात होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
'सातपूरचा खरात' अशी ओळख
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी जगतात किंवा स्थानिक स्तरावर एरंडेची ओळख 'सातपूरचा खरात' अशी असल्याची माहिती समोर येत आहे. या नावाचा वापर करून त्याने आणखी कोणाला धमकावले आहे का, याचाही तपास सुरू आहे.
पुढील तपासासाठी आणि गुन्ह्यातील गुंतागुंत पाहता, पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एरंडेच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील नवनवीन खुलाशांमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.