नाशिक शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर... २४ तासात तीन महिलांचा विनयभंग...

Share:
Main Image
Last updated: 06-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, शनिवारी (दि. ४) वेगवेगळ्या भागात तीन महिलांचा विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतील दोन आणि भद्रकाली परिसरातील एका घटनेचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तपासाला वेग दिला आहे.

पहिली घटना: किरकोळ वादातून महिलेचा विनयभंग
पहिली घटना भद्रकाली परिसरातील कथडा भागात घडली. पीडित महिला शनिवारी सायंकाळी आपल्या घरात असताना, शेजारी राहणाऱ्या मोसीन पठाण (४०) याने किरकोळ कारणावरून वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले. यावेळी संशयिताने 'तुला येथे राहू देणार नाही' अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सय्यद पुढील तपास करत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: पाठलाग करून मोबाईलमध्ये काढले फोटो
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महादेव मंदिर परिसरात दुसरी घटना घडली. पीडित महिला आणि तिची मैत्रीण शनिवारी सकाळी पायी जात असताना, एका अज्ञात संशयिताने त्यांचा पाठलाग केला. संशयिताने या दोघींचे मोबाईलमध्ये फोटो काढले. जेव्हा पीडितेने याला विरोध करत जाब विचारला, तेव्हा संशयिताने तिचा विनयभंग केला. धक्कादायक म्हणजे, संशयिताच्या आई-वडिलांनीही पीडितेची बाजू ऐकून घेण्याऐवजी तिलाच शिवीगाळ केली. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तिसरी घटना: पतीला मारहाण अन् महिलेशी अश्लील वर्तन
तिसरी घटना सातपूरमधीलच शिवाजीनगर येथील महादेव सेवालाल महाराज गार्डन परिसरात घडली. अमोल सुभाष खोतकर (३४) आणि सुरज अशोक भारद्वाज (२५) या दोन संशयितांनी पीडित महिलेच्या पतीला मारहाण करत त्यांच्या नाकावर बुक्का मारून जखमी केले. पतीला वाचवण्यासाठी महिला मध्यस्थी करण्यास गेली असता, संशयितांनी तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर तिला बळजबरीने दुचाकीवर बसण्याचा आग्रह धरत अश्लील वर्तन केले.

सातपूर येथील दोन्ही घटनांचा तपास उपनिरीक्षक न्हाळदे व हवालदार डिंगे करत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

No comments yet.