अंदरसुल, पाटोदा, नांदुरमधमेश्वर शाळांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेत निवड... मंत्री भुजबळ यांचे प्रयत्न

Share:
Main Image
Last updated: 06-Apr-2026

येवला, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील येवला तालुक्यातील अंदरसूल (मुले) व पाटोदा तसेच निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथील तीन जिल्हा परिषद शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच आधुनिक, गुणवत्तापूर्ण व जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा कायमचा आग्रह आहे. त्यांच्या या दूरदृष्टीतूनच या शाळांना ही मोठी संधी प्राप्त झाली आहे. या योजनेमुळे संबंधित शाळांमध्ये सुसज्ज इमारती, अत्याधुनिक संगणक लॅब, डिजिटल क्लासरूम यांसारख्या सुविधा निर्माण होणार असून विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण मिळणार आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ आणि क्रीडा क्षेत्रासाठी क्रीडा प्रबोधिनी यांसारख्या सुविधा विद्यार्थ्यांच्या प्रगतीस मोठा हातभार लावतील. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

प्रतिक्रिया

मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या आदर्श शाळांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल, असा मला विश्वास आहे.

- माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.