भोंदू खरातचे कॉल डिटेल्स आणि माहिती कशी मिळाली? अंजली दमानिया यांनी सारं खरं खरं सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 06-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या 'कॉल डेटा रेकॉर्ड' (CDR) च्या दाव्याने खळबळ उडाली आहे. "खरातच्या मोबाईल रेकॉर्डमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएंसह अनेक बड्या नेत्यांचे कॉल आढळले असून, यामागील आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी," अशी मागणी करताना दमानिया यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले.

सीडीआर नेमका आला कुठून?
दमानिया यांच्याकडे हा गोपनीय डेटा आला कुठून, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यावर खुलासा करताना त्या म्हणाल्या, "१ एप्रिल रोजी मला एका खासगी डिटेक्टिव्हचा फोन आला. त्याने खरातची माहिती आणि सीडीआर माझ्याकडे असल्याचे सांगून तो मला पाठवला. मी तो डेटा तपासावा म्हणून क्लाउडवर टाकला, तेव्हा त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. मी कोणतीही अनधिकृत माहिती मागितली नव्हती, ती माझ्याकडे आली आणि मी ती यंत्रणांना सोपवली आहे."

Advertisement

दिग्गज नेत्यांच्या नावांचा उल्लेख
दमानिया यांनी दावा केला की, खरातच्या कॉल लिस्टमध्ये मिलिंद नार्वेकर यांचे ८ कॉल, तसेच संजय शिरसाट, सुनील तटकरे, आशिष शेलार, चित्रा वाघ आणि केसरकर यांच्या पीएंचे नाव आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए प्रभाकर काळे यांचे अनेक कॉल असल्याचे त्यांनी नमूद केले. "कॉल काळे यांनी केले की शिंदेंनी, मला देणं-घेणं नाही, पण या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे," असे त्या म्हणाल्या.

आर्थिक व्यवहारांचा संशय
'समता' नावाच्या पतसंस्थेतून खरातला होणाऱ्या पैशांच्या व्यवहारावरही त्यांनी बोट ठेवले. फेब्रुवारी २०२५ पर्यंत कमी असलेले मेसेजेस अचानक जानेवारी २०२६ मध्ये वाढले. अजित पवार यांच्या अपघाताच्या एक दिवस आधी १७ मेसेजेस आले होते, असा दावा करत त्यांनी या आर्थिक उलाढालीची चौकशी करण्याची मागणी केली.

सदानंद दातेंवर आशा
"यंत्रणेची हिंमत आहे का मुख्यमंत्र्यांचे कॉल बाहेर काढायची? माझे डोळे झिजले पण मी सत्य शोधले," असे म्हणताना दमानिया भावूक झाल्या. त्यांनी या सर्व पुराव्यांसह एटीएस प्रमुख सदानंद दाते यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचे सांगत त्यांनी आता केवळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनच आशा असल्याचे स्पष्ट केले.

Comments

No comments yet.