भोंदू खरातच्या चौकशीत उघड झाला ३०० कोटींचा व्यवहार... अनेक धक्कादायक बाबींमुळे तपास अधिकारीही चक्रावले...

Share:
Main Image
Last updated: 06-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पापुद्रे उलगडत आहेत. खरात केवळ भोंदूगिरीच करत नव्हता, तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी तो चक्क 'हवाला' रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या बेकायदा व्यवहारांचे जाळे दुबईपर्यंत पसरले असून, मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून ही संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती, अशी खळबळजनक माहिती 'एसआयटी'च्या तपासातून समोर आली आहे.

२५ हजारांची रूम आणि ३०० कोटींचा संशयास्पद व्यवहार
अशोक खरातने मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये दिवसाला २५ हजार रुपये भाडे असलेली रूम वर्षभरासाठी कायमस्वरूपी बुक केली होती. याच रूममधून तो बिल्डर्स आणि बड्या धेंडांच्या कोट्यवधींच्या व्यवहारांची देवाण-घेवाण करत असे. विशेष म्हणजे, एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा ३०० कोटींचा व्यवहार सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. खरातच्या दोन मोबाईलमधून मिळालेले चॅट्स, व्हॉईस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्सवरून हे रॅकेट किती मोठे आहे, याची प्रचिती येते.

'आशीर्वादा'च्या नावाखाली जमिनी लाटल्या
नाशिक आणि पुण्यातील किमान पाच जण या हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. 'आशीर्वादा'च्या नावाखाली हवालामार्गे पैशांची ट्रान्स्फर केली जात होती. अनेक ठिकाणी जमिनीच्या व्यवहारात काळ्या पैशाचा वापर करण्यात आला असून, खरातने अनेकांच्या जमिनी लाटल्याचाही आरोप आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये देवदर्शनाच्या बहाण्याने बनावट बँक खाती उघडण्यात आली होती.

Advertisement

समता पतसंस्थेत १०० संशयास्पद खाती; ६० कोटींचा व्यवहार
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेत खरातने आपल्या प्रभावाखाली ५७ खातेदारांच्या नावे तब्बल १०० खाती उघडली होती. धक्कादायक म्हणजे, यातील सर्व खात्यांवर नॉमिनी (वारसदार) म्हणून स्वतः अशोक खरातचे नाव आहे आणि सर्व खात्यांशी त्याचाच मोबाईल नंबर जोडलेला आहे. २०२१ पासून या खात्यांमधून ६० कोटींहून अधिक रकमेची उलाढाल झाली आहे. या प्रकरणी खरातसह शाखा व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय कनेक्शनची चर्चा?
 या प्रकरणातील तपासात काही नावे समोर येत आहेत. खरात वारसदार असलेल्या खात्यांमध्ये 'प्रतिभा चाकणकर' आणि अन्य एक चाकणकर अशा नावांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहिणीचे नावही प्रतिभा असल्याने यावरून आता राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
 
आता 'ईडी'चा दणका बसणार; फडणवीसांचा इशारा
खरातने जमवलेली अमाप माया आणि हवाला व्यवहारांचे गांभीर्य लक्षात घेता, आता या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ED) करण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कडक भूमिका घेतली असून, "अशोक खरात प्रकरणात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, ईडीमार्फत याचा सखोल तपास केला जाईल," असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
 * दुबई कनेक्शन: हवालाचे पैसे परदेशात वळवल्याचा संशय.
 * बनावट कागदपत्रे: इतरांचे पॅन आणि आधार कार्ड वापरून खाती उघडली.
 * बिल्डर लॉबी: नाशिकमधील बड्या बांधकाम व्यावसायिकांची चौकशी होणार.
 * डिजिटल पुरावे: मोबाईल डेटा रॅकेटचा मुख्य दुवा.

शिर्डी पोलीस सध्या १९ खातेदारांची कसून चौकशी करत असून, आगामी काळात अनेक बड्या चेहऱ्यांचे मुखवटे उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments

No comments yet.