मुंबई (प्रतिनिधी) ०५ एप्रिल - भोंदू बाबा अशोक खरात याच्या तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकलेल्या राज्यातील ३९ आमदारांची नावे सरकारने जाहीर करून त्यांचे तातडीने राजीनामे घ्यावेत, या मागणीसाठी 'मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष' (माकप) आक्रमक झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या, ६ एप्रिल रोजी राज्यभर तालुकास्तरावर तीव्र आंदोलने करण्यात येणार असल्याची घोषणा माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
संविधानिक कर्तव्याचा विसर
निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानाशी बांधील असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आणि तो समाजात रुजवणे ही त्यांची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, लोकप्रतिनिधीच जर अशा भोंदूगिरीला आणि तंत्र-मंत्राला बळी पडत असतील, तर ते संविधानाचा अपमान आहे. अशा वागणुकीमुळे अंधश्रद्धेला राजमान्यता मिळते आणि सामान्य जनताही या भोंदूगिरीला बळी पडते, असे माकपच्या राज्य कमिटीने म्हटले आहे.
व्हिडीओ हटवण्याची मागणी
भोंदू बाबा अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे संबंधित महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असून, राज्य सरकारने हे व्हिडिओ तातडीने हटवण्यासाठी सायबर यंत्रणेमार्फत कडक पावले उचलावीत, अशी मागणीही पक्षाने केली आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये हवी 'अंनिस' सेल
केवळ अशोक खरातच नव्हे, तर राज्यात फोफावलेल्या सर्वच भोंदू बाबांविरुद्ध सरकारने विशेष मोहीम राबवावी. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करण्याचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
"भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच त्यांना समर्थन देणारे लोकप्रतिनिधीही दोषी आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून या प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. उद्याच्या आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे."
— डॉ. अजित नवले, राज्य सचिव, माकप.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
* भोंदूगिरीत सामील ३९ आमदारांची यादी जाहीर करून त्यांचे राजीनामे घ्यावेत.
* अशोक खरातसह त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.
* सोशल मीडियावरील ज्योतिषी, तंत्र-मंत्राच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करावे.
* जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करा.