भोंदू खरातच्या मुलाचाही चकवा... चौकशीनंतर 'नॉट रिचेबल'... पोलिसांच्या हाती तुरी देत पळाला?

Share:
Main Image
Last updated: 05-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ एप्रिल -  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करणाऱ्या विशेष तपास पथकाला (SIT) आता खरातच्या मुलानेही गुंगारा दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन दिवसांच्या कसून चौकशीनंतर घरी सोडलेला हर्षवर्धन खरात आता अचानक 'नॉट रिचेबल' झाला असून, तो पोलिसांना न कळवताच पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चौकशीत सहकार्य टाळले
शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एसआयटीच्या हाती ती लागली नाही, मात्र पथकाने मुलगा हर्षवर्धन खरात याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोन दिवस चाललेल्या या चौकशीत हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते. चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला घरी सोडण्यात आले होते, मात्र त्यानंतर तो गायब झाला आहे.

Advertisement

पोलिसांची परवानगी न घेताच पलायन?
कायदेशीर प्रक्रियेनुसार, गंभीर गुन्ह्याची चौकशी सुरू असताना संशयिताने किंवा संबंधित व्यक्तीने शहर सोडण्यापूर्वी तपास यंत्रणांची परवानगी घेणे अनिवार्य असते. मात्र, हर्षवर्धनने कोणत्याही अधिकाऱ्याला कल्पना न देता मोबाइल बंद केला आहे. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी शोध घेतला असता तो तिथे मिळून आला नाही. त्यामुळे त्याने चौकशी टाळण्यासाठी जाणीवपूर्वक पलायन केले असावे, असा संशय बळावला आहे.

तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
भोंदू अशोक खरात सध्या गजाआड असला तरी, त्याची पत्नी कल्पना खरात गुन्हा दाखल झाल्यापासून अद्याप फरारच आहे. आता पाठोपाठ मुलगा हर्षवर्धनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपीचे कुटुंबीय एकामागून एक गायब होत असल्याने एसआयटीच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्यावर असलेल्या वॉचवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या हर्षवर्धन नाशिक शहरात आहे की शहराबाहेर पसार झाला आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवान चक्रे फिरवली आहेत. तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली, याचाही तपास आता सुरू झाला आहे.

Comments

No comments yet.