नाशिक, (प्रतिनिधी) ०५ एप्रिल - भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच, आता 'एरंडे फाइल्स'ने नाशिक हादरले आहे. स्वतःच्याच ऑफिस बॉयला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवून आपले काळेकृत्य लपवू पाहणारा व्यावसायिक रवींद्र एरंडे (६२) आता स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्या हार्डडिस्कमध्ये तब्बल १२१ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून, सातपूर पोलिसांनी त्याला बलात्कार आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
संशयित एरंडे याने एका महिलेला तिच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पाडून त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले आणि त्याचे मोबाइलद्वारे चोरून चित्रीकरण केले. या व्हिडिओच्या आधारे तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता. मात्र, हा सर्व प्रकार एरंडेच्या 'ऑफिस बॉय'च्या लक्षात आला. त्याने एरंडेचा टॅब आणि हार्डडिस्क चोरून आपल्या मित्रांच्या मदतीने एरंडेलाच १२ लाख रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
खंडणीचा बनाव अंगलट आला
स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी एरंडेने पोलिसांत धाव घेऊन खंडणीखोरांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांना अटक केली आणि त्यांच्याकडून डीव्हीडी व हार्डडिस्क जप्त केली. मात्र, जप्त केलेल्या साहित्याची तपासणी केली असता पोलिसांना धक्काच बसला. त्यात एरंडेचे १०० हून अधिक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आले.
न्यायालयाकडून पोलीस कोठडी
शुक्रवारी रात्री पीडित महिलेने सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एरंडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शनिवारी त्याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, सरकारी पक्षातर्फे ॲड. किरण बेंडभर यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एरंडेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी पीडिता समोर येण्याची शक्यता
भोंदूबाबा खरात प्रकरणाप्रमाणेच एरंडेनेही अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय पोलिसांना आहे. हार्डडिस्कमधील १२१ व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. या कारवाईनंतर आणखी काही पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येत असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.