नाशिक, (प्रतिनिधी) ४ एप्रिल - प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेत तरुणीला ब्लॅकमेल करणे आणि तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. अश्लील फोटोंच्या जोरावर वारंवार अत्याचार करणाऱ्या संशयित नराधमाला सातपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनस जावेद शेख (वय २०, रा. फातेमा हाऊस, तेजाळे चौक, मोटा राजवाडा, वडाळा नाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि संशयित अनस हे एकमेकांच्या परिचयाचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. १० मार्च रोजी अनसने तरुणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने पिंपळगाव बहुला परिसरातील 'आईसाहेब मिसळ' या ठिकाणी नेले. येथील लॉजिंगमधील एका रूममध्ये त्याने पीडितेसोबतचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केले.
धमकावून केला बलात्कार
हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अनसने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने याकडे दुर्लक्ष केले असता, संशयिताने याच फोटोंचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
इन्स्टाग्रामवर फोटो टाकताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये
संशयित एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने गुरुवारी (दि. २) पीडितेसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केले. आपली बदनामी झाल्याचे लक्षात येताच पीडितेने तात्काळ सातपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासचक्रे फिरवली आणि संशयित अनस शेख याला बेड्या ठोकल्या.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत. अशा प्रकारे कोणाचीही सोशल मीडियावरून अडवणूक किंवा फसवणूक होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सातपूर पोलिसांनी केले आहे.