नाशिक, (प्रतिनिधी) ४ एप्रिल - शहरातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक वसाहतीचा विस्तार लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासन आदेशानुसार, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने ‘एमआयडीसी पोलीस ठाणे’ स्थापन करण्यात आले असून, १ एप्रिल २०२६ पासून हे ठाणे अधिकृतपणे सेवेत रुजू झाले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर पोलीस दलाच्या पुनर्रचनेवर भर दिला आहे. अंबड आणि सातपूर ही दोन्ही पोलीस ठाणी कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत मोठी आणि संवेदनशील मानली जात होती. या दोन्ही ठाण्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा आणि नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळावी, या उद्देशाने या नवीन ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
असे असेल नवीन पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र:
नव्याने अस्तित्वात आलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात खालील परिसरांचा समावेश करण्यात आला आहे:
अंबड परिसर: अंबड एमआयडीसी, अंबड गावातील मनपा शाळेमागील भाग, केवळ पार्क, नवनाथ नगर.
निवासी भाग: खाडी परिसर, घरकुल योजना, दत्तनगर, चुंचाळे गाव, संजीवनगर, म्हाडा कॉलनी.
विस्तारित भाग: लोकशाही (डेमोक्रसी) हॉटेलमागील परिसर ते बेळगाव ढगा पर्यंतचा भाग.
महामार्ग व इतर: तिरडशेत, पांजारपोळ, जाधव संकुल, पाटील पार्क. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावरील सीएनजी पेट्रोल पंप ते पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा परिसर.
प्रशासनाचे आवाहन:
"नव्याने निश्चित केलेल्या हद्दीतील नागरिकांनी आपल्या तक्रारी, अर्ज किंवा कोणत्याही कायदेशीर मदतीसाठी आता थेट एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.