मोबाईलमध्ये सापडल्या १२१ अश्लील क्लिप्स... १२ लाखांची खंडणी अन् महिलेचे लैंगिक शोषण करणारा जेरबंद...

Share:
Main Image
Last updated: 04-Apr-2026

नाशिक, ( प्रतिनिधी) ४ एप्रिल - सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन १२ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि एका महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला सातपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयितावर भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ६३ वर्षीय रवींद्र गणपत एरंडे या संशयिताने पीडित महिलेला तिच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. पीडित महिला अनुसूचित जातीची असल्याचे माहीत असतानाही, संशयिताने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर नाशिक आणि इगतपुरी परिसरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडितेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे १२ लाख रुपयांची खंडणी मागितली.

१२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स हस्तगत या गंभीर प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित रवींद्र एरंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ मोबाईल, २ पेनड्राईव्ह आणि १ मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. या उपकरणांची तांत्रिक तपासणी केली असता, त्यात पीडित महिलेसह इतर अनेक महिलांचे एकूण १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून संशयिताने इतरही महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Advertisement

पोलिसांचे आवाहन

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहीरे करत आहेत. संशयित रवींद्र एरंडे याच्याकडून कोणाची फसवणूक किंवा छळ झाला असल्यास अशा महिलांनी न घाबरता सातपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रारदाराची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments

No comments yet.