सुंदर नारायण मंदिराच्या कामावर दगड कोसळून मजूराचा मृत्यू.

Share:
Last updated: 03-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ एप्रिल - येथील रविवार पेठ भागातील ऐतिहासिक सुंदर नारायण मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी १०० फूट उंचीवरून दगड अंगावर कोसळून एका ६० वर्षीय मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भास्कर आर. मुगम (वय ६०, रा. पवारवाडी, जेलरोड) असे मृत मजूराचे नाव आहे.

घटनेचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील प्रसिद्ध सुंदर नारायण मंदिराच्या दगडी बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. २४ फेब्रुवारी रोजी भास्कर मुगम हे या ठिकाणी काम करत असताना, अचानक १०० फूट उंचीवर बसवलेला एक जड दगड निखळून त्यांच्या अंगावर कोसळला. या भीषण अपघातात मुगम यांच्या कमरेला, मांडीला आणि पायाला गंभीर इजा झाली होती.

Advertisement

उपचारादरम्यान पाय गमवावा लागला

अपघात घडल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय निकामी झाल्याने तो कापून काढावा लागला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र बुधवारी (१ एप्रिल) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरू

या दुर्दैवी घटनेबाबत मृताचे चुलत भाऊ गणेश मुर्ता यांनी दिलेल्या माहितीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार बुगल या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना होत्या की नाही, यादृष्टीनेही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet.