नाशिकमध्ये गुंडगिरी वाढली... कोयते नाचवत वाटसरूंना लुटले... सिग्नल तोडणाऱ्यांचा कारचालकावर 'फायटर'ने हल्ला

Share:
Main Image
Last updated: 03-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ एप्रिल - शहरात गुन्हेगारांचे धाडस कमालीचे वाढले असून, भररस्त्यात धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजवण्याच्या आणि किरकोळ कारणावरून जीवघेणे हल्ले करण्याच्या दोन खळबळजनक घटना बुधवारी (दि. १) घडल्या. पाथर्डी फाटा भागात एका वाटसरूला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, तर उंटवाडी परिसरात वाहतूक नियम पाळण्यास सांगणाऱ्या कारचालकावर दुचाकीस्वार टोळक्याने 'फायटर'ने हल्ला चढवला. या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

घटना १: कोयत्याचा धाक दाखवत जबरी चोरी
महामार्गावरील गरवारे पॉईंट येथील दामोदर चौक परिसरात बुधवारी रात्री एका टोळक्याने हातात धारदार शस्त्रे नाचवत धुमाकूळ घातला. यश मोहन खिवसरा (१९, रा. हनुमाननगर) हा युवक रात्री घराकडे जात असताना संशयितांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यशने भीतीपोटी पळ काढला असता, टोळक्याने त्याचा पाठलाग केला. त्याला पकडून कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि मारहाण करून खिशातील १००० रुपयांची रोकड लंपास केली.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश लाटे, अजय दहेकर (सराईत गुन्हेगार), बारिक मोरे आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला असून उपनिरीक्षक शिरसाठ अधिक तपास करत आहेत.

घटना २: वाहतुकीचा नियम सांगणे पडले महागात!
दुसरी घटना उंटवाडी येथील सिटी सेंटर सिग्नल भागात दुपारी घडली. राजेश भगवान दिपके (रा. गंगापूर रोड) हे कारने सीबीएसकडून त्रिमूर्ती चौकाकडे जात होते. सिग्नल सुटलेला असताना एबीबी सर्कलकडून येणाऱ्या २-३ दुचाकीस्वारांनी सिग्नल तोडून भरधाव वेगाने कारसमोर दुचाकी आणल्या. दिपके यांनी या दुचाकीस्वारांना हटकले आणि नियम पाळण्यास सांगितले.
याचा राग आल्याने संशयित टोळक्याने दिपके यांची कार अडवली आणि त्यांना कारबाहेर खेचून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता एका संशयिताने दिपके यांच्या डोक्यावर आणि छातीवर 'लोखंडी फायटर'ने गंभीर प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात दिपके जखमी झाले असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Comments

No comments yet.