टॅब चोरी, अश्लील व्हिडीओ अन् १२ लाखांची खंडणी... नाशकात पोलिसांची 'सिनेस्टाईल' कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 03-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ एप्रिल - एका ज्येष्ठ नागरिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी करून त्यातील वैयक्तिक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागाणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवत पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ५ तासांच्या आत ४ संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनुसार, काही अनोळखी इसमांनी त्यांच्या कार्यालयातील टॅब चोरला होता. या टॅबमध्ये तक्रारदाराचे त्यांच्या मैत्रिणींसोबतचे जुने व्हिडीओ आणि फोटो होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी १२ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये खंडणी म्हणून स्वीकारल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला त्यांचे न्यूड फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

Advertisement

पोलिसांचा सापळा आणि थरार
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी तातडीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ची दोन पथके तयार करण्यात आली.

तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी आडगाव शिवारातील १० व्या मैल परिसरात लपल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथक तिथे पोहोचले असता, आरोपी एका बंद गाळ्याच्या मागे लपलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना चहुबाजूंनी वेढा घालून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१) आकाश पुंडलिक बकरे (वय २८, रा. संदीप नगर, सातपूर)
२) प्रकाश रामदास पानपाटील (वय २५, रा. सातपूर कॉलनी)
३) सूरज सुनील गवई (वय २७, रा. सातपूर)
४) श्रीपत भीमराव शिंदे (वय ३८, रा. खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर)

यांनी केली कारवाई
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, सपोनि हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, अंमलदार शंकर काळे, महाजन, आहेर, खरपडे, संजय दराडे, पारस देशमुख, महेश खांडबहाले, सागर गुजाळ, सचिन आजबे, अमोल मोरे आणि सोनु खाडे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहीफळे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.