नाशिक, (प्रतिनिधी) २ एप्रिल - पतीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने दुसऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालय परिसरात घडली. याप्रकरणी संशयित पती-पत्नीविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल देवरे आणि त्याची पत्नी (पूर्ण नाव समजले नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित विशाल देवरे हा गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. ती कामावर जात असताना वारंवार तिचा रस्ता अडवून, 'माझ्याशी बोल, नाहीतर मी मरून जाईन' अशी धमकी देत तो बोलण्याचा आग्रह धरत होता. या सर्व प्रकारामुळे पीडित महिला त्रस्त होती.
संशयाचं जाळं आणि राडा
विशाल आणि पीडित महिला यांच्यात संवाद होत असल्याचा संशय विशालच्या पत्नीला होता. याच संशयातून बुधवारी (दि. २५) संशयित पत्नीने भावबंधन मंगल कार्यालय परिसरातील सप्तशृंगी देवी मंदिरासमोर पीडितेेला गाठले आणि जाब विचारण्यास सुरुवात केली.
यावेळी वादावादी झाली असता, पीडितेने "तुझाच पती मला वारंवार फोन करतो" असे स्पष्टपणे सांगितले. या उत्तराने संतप्त झालेल्या संशयित पत्नीने पीडितेवर हल्ला चढवत तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भररस्त्यात झालेल्या या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस कारवाई:
पीडितेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास हवालदार सचिन आहिरे करत आहेत.