येवल्यातील 'नगरसुल' रेल्वे स्थानकाचे आता हे असणार नाव... नाव बदलासाठी भारतीय रेल्वेची मान्यता... 

Share:
Main Image
Last updated: 01-Apr-2026

नाशिक,येवला, (प्रतिनिधी) १ एप्रिल - येवला मतदारसंघातील नगरसूल या रेल्वे स्थानकाचे 'नागरसोल' हे नाव होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून या चुकीच्या नावात बदल करून या स्थानकाचे नाव "नगरसूल " करण्यास मध्य रेल्वे विभागाने मान्यता दिली आहे. येवला मतदारसंघातील 'नगरसुल' रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु होता. श्री क्षेत्र शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे टर्मिनल असलेल्या या रेल्वे स्थानकाचा उल्लेख यापूर्वी 'नागरसोल' असा चुकीचा केला जात होता. ही बाब लक्षात घेऊन महसुली नोंदींशी सुसंगत असे 'नगरसुल' नाव व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी शिफारस करून गृह विभागामार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्या नंतर दक्षिण मध्य रेल्वेने अधिकृत परिपत्रक जारी करून आता या स्थानकाचे नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत 'नगरसुल' (NAGARSUL) असे सुधारित केले आहे.

येवला मतदारसंघातील रेल्वे स्थानकाचे नाव 'नगरसुल' असेच असले पाहिजे, अशी स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ही जनभावना लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी दि.१२ मार्च २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे नगरसुल रेल्वे स्थानकाचे नाव सुधारण्याची विनंती केली होती. तसेच दि.२८ जून २०२५ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांना आणि २१ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्राद्वारे महसुली नोंदींनुसार रेल्वे स्थानकाच्या नावात दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची अखेर केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने दखल घेतली असून दक्षिण मध्य रेल्वेने अधिकृत परिपत्रक जारी करून स्थानकाचे नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत 'नगरसुल' (NAGARSUL) असे सुधारित केले आहे. हा निर्णय येवला मतदारसंघातील जनतेच्या भावनांचा सन्मान करणारा आहे.

Advertisement

प्रतिक्रिया

नगरसूल रेल्वे स्थानकाचा 'नागरसोल'या चुकीच्या नावाने उल्लेख आजवर केला जात होता. महसूल दफ्तरी असलेले नाव या रेल्वे स्थानकाला असावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. त्यामुळे "नगरसूल" या मूळ नावानेच आता या स्थानकाची ओळख असणार आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय गृह मंत्री अमितजी शहा, राज्याचे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो.

-माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.