येवला, (प्रतिनिधी) १ एप्रिल - माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या येवला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही मैदानावर उत्साह, थरार आणि खेळाडूंच्या दमदार कामगिरीची अविस्मरणीय मेजवानी क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळाली. दिवसभरात झालेल्या सहा सामन्यांमध्ये विविध संघांनी जिद्द, शिस्तबद्ध खेळ आणि उत्कृष्ट फलंदाजी-गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत स्पर्धेतील आपला दबदबा सिद्ध केला. या स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, प्रत्येक सामन्यात चौकार-षटकारांचा वर्षाव, अचूक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चपळता यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. येवला आणि परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने क्रीडा पर्व ठरत आहे.
पहिला सामना : देवगाव रॉकर्सचा विंचूर रेंजर्सवर ६ विकेट्सनी विजय
दुसऱ्या दिवसाची सुरुवातच एका रंगतदार सामन्याने झाली. विंचूर रेंजर्स संघाने प्रथम फलंदाजी करत ६९ धावांत ५ गडी गमावले. या धावसंख्येचा पाठलाग करताना देवगाव रॉकर्स संघाने संयमी आणि नियोजनबद्ध फलंदाजी करत ७१ धावा करून ४ गडी गमावत ६ विकेट्सनी विजय संपादन केला.
या सामन्यात सचिन पवार यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या शानदार कामगिरीबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. तर आक्रमक फलंदाजीसाठी गौरव भालेराव यांना स्ट्रायकर पुरस्कार देण्यात आला.
दुसरा सामना : मुखेड ग्लेडिएटरचा राजापूर अव्हेंजर्सवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय
दिवसातील दुसऱ्या सामन्यात राजापूर अव्हेंजर्स संघाने प्रथम फलंदाजी करत ५० धावांत ४ गडी गमावले. प्रतिस्पर्धी मुखेड ग्लेडिएटर संघाने हा लक्ष्य सहज गाठत ५२ धावा करून केवळ २ गडी गमावत ८ विकेट्सनी शानदार विजय मिळवला.
या सामन्यात राजू सय्यद यांनी आपल्या प्रभावी खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या भेदक कामगिरीमुळे त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाजीबद्दल ज्ञानेश्वर धात्रक यांना स्ट्रायकर पुरस्कार बहाल करण्यात आला.
तिसरा सामना : गुड मॉर्निंग ४०+ संघाचा दमदार खेळ; डॉक्टर्स ३६५ वर ३८ धावांनी विजय
दिवसातील तिसऱ्या सामन्यात गुड मॉर्निंग ४०+ संघाने शानदार फलंदाजी करत ९९ धावा करून ४ गडी गमावले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या डॉक्टर्स ३६५ संघाला ६१ धावांवर ३ गडी इतक्याच मजल मारता आली.
परिणामी गुड मॉर्निंग ४०+ संघाने हा सामना ३८ धावांनी जिंकत प्रभावी विजय मिळवला. या सामन्यात प्रतीक पटेल यांनी सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला.तर आक्रमक फलंदाजीबद्दल योगेश जेजुरकर यांना स्ट्रायकर पुरस्कार मिळाला.
चौथा सामना : येवला मास्टर्सचा येवला फाइटर्सवर २९ धावांनी विजय
दिवसातील सर्वाधिक चर्चेतील सामन्यांपैकी एक सामना येवला मास्टर्स आणि येवला फाइटर्स यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना येवला मास्टर्स संघाने दमदार खेळ करत १०५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला आणि ४ गडी गमावले.
या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना येवला फाइटर्स संघाने चांगली झुंज दिली आणि ७६ धावा करून १ गडी गमावला, मात्र विजयापासून ते २९ धावा दूर राहिले.
या सामन्यात अनस अन्सारी यांनी अप्रतिम खेळ करत मॅन ऑफ द मॅच पुरस्कारावर नाव कोरले. तर कुशल नाकोड यांना त्यांच्या प्रभावी खेळासाठी स्ट्रायकर पुरस्कार देण्यात आला.
पाचवा सामना : येवला टायगर्सचा येवला ब्लास्टर्सवर ७ विकेट्सनी विजय
स्थानिक संघांमधील आणखी एका रोमांचक सामन्यात येवला ब्लास्टर्स संघाने प्रथम फलंदाजी करत ४६ धावांत ३ गडी गमावले. हे लक्ष्य येवला टायगर्स संघाने संयमी आणि अचूक फलंदाजीच्या जोरावर ५० धावा करून ३ गडी गमावत ७ विकेट्सनी जिंकले.
या सामन्यात शाहिद अन्सारी यांनी जबरदस्त कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या उत्कृष्ट खेळासाठी त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. तर सूफियान शेख यांना स्ट्रायकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सहावा सामना : अंदरसुल स्ट्रायकर्सचा सनरायझर्स नगरसुलवर ९ विकेट्सनी एकतर्फी विजय
दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना अंदरसुल स्ट्रायकर्स आणि सनरायझर्स नगरसुल यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स नगरसुल संघाने ५० धावा करून ४ गडी गमावले.
हे लक्ष्य अंदरसुल स्ट्रायकर्स संघाने अतिशय सहजतेने पार करत ५४ धावा करून केवळ १ गडी गमावत ९ विकेट्सनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात दीपक त्रिभुवन यांनी उत्कृष्ट खेळ करत मॅन ऑफ द मॅच किताब मिळवला. तर मच्छिंद्र मोरे यांना स्ट्रायकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सर्वच सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाभावना, शिस्त आणि जिद्द दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. फलंदाजांनी आकर्षक फटकेबाजी केली, तर गोलंदाजांनीही अचूक टप्प्यावर चेंडू टाकत सामन्यांमध्ये रंगत निर्माण केली. मैदानावरचा हा उत्साह पाहून येवला प्रीमियर लीग ही केवळ स्पर्धा नसून स्थानिक क्रिकेट प्रतिभेला व्यासपीठ देणारा मोठा क्रीडा उत्सव असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. या स्पर्धेमुळे परिसरातील तरुणांमध्ये क्रिकेटबद्दल नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रेक्षकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.