नाशिक, (प्रतिनिधी) १ एप्रिल - मोठ्या व्यासाच्या लोखंडी पाईपांखाली दबून कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर पंचवटी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी दोन नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
राजबिहारी लिंकरोडवरील राजमाता मंगल कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत २७ मार्च रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. मुकेशकुमार बैजनाथ पनीका (२२, रा. मध्य प्रदेश) हा तरुण चालक लोखंडी पाईप घेऊन नाशिकमध्ये आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. कुंभवेस्ट मॅनेजमेंट प्रा.लि. कंपनीच्या मागणीनुसार मुकेशकुमार हा बहुचाकी ट्रकमधून (MH 46 CU 6186) हे पाईप घेऊन आला होता.
सायंकाळच्या सुमारास ट्रक रिकामा करण्यासाठी तो पाईपांवर चढला. पाईपांना बांधलेली साखळी सोडत असताना अचानक खालचे पाईप निसटले आणि मुकेशकुमार वरच्या पाईपांसह जमिनीवर कोसळला. प्रचंड वजनाच्या या पाईपांखाली दबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी खालील संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे:
१. सोनु कुमार यादव – (व्यवस्थापक, कुंभवेस्ट मॅनेजमेंट प्रा.लि.)
२. संतोष गणपत थोरात – (व्यवस्थापक, मेघा पाईप कंपनी प्रा.लि, खालापूर, जि. रायगड)
तपासाची चक्रे फिरली:
हवालदार केशव भोये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.