मुंबई, (प्रतिनिधी) १ एप्रिल - जागतिक आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ओरॅकल'ने (Oracle) अचानक मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करून तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने जगभरातील सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला असून, यामध्ये भारतातील सर्वाधिक १२,००० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कंपनीचा व्यवसाय यशाच्या शिखरावर असताना आणि नुकताच OpenAI सोबत मोठा करार झालेला असताना ही कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भल्या पहाटे ईमेल अन् सिस्टिम लॉक
अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपली आपबिती मांडताना सांगितले की, पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान अचानक ईमेलद्वारे त्यांना कामावरून काढल्याचे कळवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा चर्चा न करता थेट ईमेल पाठवून काही मिनिटांतच कर्मचाऱ्यांचा सिस्टिम ॲक्सेस बंद करण्यात आला. २०-२० वर्षे सेवा दिलेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनाही अशाच प्रकारे घरचा रस्ता दाखवण्यात आल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
कपातीमागचे कारण: एआय आणि ऑटोमेशन
ओरॅकल आता आपला निधी आणि लक्ष मानवी मनुष्यबळाऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सेंटर्सच्या पायाभूत सुविधांवर केंद्रित करत आहे.
गुंतवणूक: कंपनीने OpenAI सोबत ३०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा करार केला आहे.
बदल: मनुष्यबळावर होणारा खर्च कमी करून तो पैसा ऑटोमेशन आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवण्याचे कंपनीचे धोरण आहे.
भारताला मोठा फटका
या लेऑफचा सर्वाधिक परिणाम भारतात दिसून आला आहे. भारतातील विविध शहरांतील १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांवरही याची टांगती तलवार आहे. अमेरिकेतील कठोर कामगार कायद्यांमुळे तिथल्या नागरिकांना काढणे कठीण असल्याने, त्याचा फटका स्थलांतरित आणि भारतीय कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
असे असेल 'एक्झिट पॅकेज'
कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी काही आर्थिक तरतुदी जाहीर केल्या आहेत:
बोनस: एक वर्ष पूर्ण केलेल्यांना १५ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळेल.
वेतन: नोटीस पिरियडचे वेतन, लीव्ह एनकॅशमेंट आणि ग्रॅच्युइटी दिली जाईल.
स्वेच्छानिवृत्ती: जे स्वतःहून पद सोडतील त्यांना २ महिन्यांचा अतिरिक्त पगार मिळेल.
पुढील महिन्यात आणखी मोठी कपात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून, यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.