नाशकात वनविभागाच्या 'फाईल्स' चोरीला...  पुरावे नष्ट करण्याचा डाव...

Share:
Main Image
Last updated: 01-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ एप्रिल - शहरातील त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल भागात असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी कोणत्याही मौल्यवान वस्तूऐवजी मुळेगाव आणि अंजनेरी परिमंडळातील अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मायको सर्कल परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे एक निवासस्थान असून सध्या ते वापरात नव्हते. या बंद निवासस्थानाचा वापर मुळेगाव आणि अंजनेरी परिमंडळाचे अधिकृत कागदपत्रे ठेवण्यासाठी केला जात होता. गेल्या शनिवारी (दि. २८) रात्री अज्ञात चोरट्यांनी या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे आणि सामानाची उचकापाचक करून चोरट्यांनी कागदपत्रांचे गठ्ठे लंपास केले.

Advertisement

कोणती कागदपत्रे चोरीला गेली?
चोरीला गेलेल्या कागदपत्रांमध्ये वनविभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नोंदींचा समावेश आहे:
 अतिक्रमण धारकांची माहिती: विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झालेली पात्र व अपात्र अतिक्रमण धारकांची यादी.
 वन अपराध पुस्तके: वनातील गुन्ह्यांची नोंद असलेली महत्त्वाची पुस्तके.
 शासकीय रजिस्टर: रोजगार हमी योजना रजिस्टर, फायर रजिस्टर आणि वनचराई संबंधित माहिती.
 प्लॉट सारा: फॉरेस्ट प्लॉटसारा आणि वनराई पुस्तकांचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज.

पोलीस तपासाला वेग
वनकर्मचारी प्रेरणा तबाजी पाठक यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केवळ कागदपत्रे चोरीला गेल्यामुळे यामागे वनजमिनीशी संबंधित किंवा अतिक्रमणाशी संबंधित काही मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार माळोदे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

या चोरीमुळे मुळेगाव आणि अंजनेरी भागातील वनजमिनींच्या व्यवहारांमधील पारदर्शकता आणि सुरू असलेल्या चौकशांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments

No comments yet.