खरातच्या 'पापकर्मात' डॉक्टरांची साथ?  नाशिकचे नामांकित डॉक्टर SIT च्या रडारवर...

Share:
Main Image
Last updated: 01-Apr-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १ एप्रिल - महिला लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरत चालला असून, एसआयटी (SIT) च्या तपासात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाची व्याप्ती केवळ मंत्रतंत्रापुरती मर्यादित न राहता, त्यात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरांचाही सहभाग असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर वैद्यकीय क्षेत्रातील मोठी नावे आल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

तपासाची नवी दिशा: औषधांचा 'काळा' बाजार?
पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत खरातच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत:
 * गर्भनिरोधकांचा वापर: पीडित महिलांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी खरात विशिष्ट औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या देत होता का?
 * डॉक्टरांचे संगनमत: ही प्रतिबंधित औषधे त्याला कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा चिठ्ठीशिवाय (Prescription) मिळत होती?
या दोन प्रमुख मुद्द्यांवरून आता तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. जर एखाद्या डॉक्टरने नियमावली धाब्यावर बसवून खरातला मदत केली असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.

Advertisement

संमोहित करण्यासाठी ड्रग्जचा वापर?
खरातने केवळ मंत्रतंत्राच्या जोरावर महिलांवर नियंत्रण मिळवले की त्यामागे काही अमली किंवा भूल देणाऱ्या औषधांचा (Sedatives) हात होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
"पीडितेची शुद्ध हरपण्यासाठी किंवा तिला संमोहित करण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ खायला किंवा प्यायला दिले जात होते का? या औषधांचा पुरवठा नेमका कोठून झाला आणि त्यामागे कोणत्या नामांकित क्लिनिक किंवा हॉस्पिटलचे धागेदोरे आहेत?" यावर एसआयटीने लक्ष केंद्रित केले आहे.

मंत्रतंत्राचे 'डेमो' आणि मानसिक नियंत्रण
खरात विशिष्ट मंत्र म्हणून पीडितेवर मानसिक नियंत्रण मिळवत असल्याचा आरोप आहे. तपास पथकाने खरातची ती मंत्र म्हणण्याची कृती आणि त्यावेळची पीडितेची मानसिक स्थिती याचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवले आहे. तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांना 'सायकोलॉजिकल ट्रॅप'मध्ये अडकवून त्यांचे शोषण केले जात असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण
येत्या काही दिवसांत एसआयटी या प्रकरणात काही बड्या डॉक्टरांना चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. जर या गुन्ह्यात डॉक्टरांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संगनमत असल्याचे निष्पन्न झाले, तर नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्राला मोठा डाग लागण्याची शक्यता आहे.

आता सर्वांचे लक्ष एसआयटीच्या पुढील कारवाईकडे आणि खरातच्या 'बड्या' साथीदारांच्या नावांकडे लागले आहे.

Comments

No comments yet.