नाशिक, (विशेष प्रतिनिधी) ३१ मार्च - नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या रामनवमी निमित्त रविवारी (दि. २९) निघालेल्या राम आणि गरूड रथ मिरवणुकीत चोरट्यांनी आपला 'हात' दाखवला आहे. मिरवणुकीतील अलोट गर्दीचा फायदा घेत भामट्यांनी तब्बल १० भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे अलंकार लंपास केले. यामध्ये एका पुरुषाचे सोन्याचे लॉकेट आणि ९ महिलांच्या मंगळसूत्रांचा समावेश असून, एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गर्दीची संधी साधून 'डल्ला'
मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरातील मानेक्षानगर येथील रहिवासी सोमनाथ रामचंद्र खैरे यांनी याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खैरे हे रविवारी सायंकाळी रामरथ आणि गरूड रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असताना, जनसागराचा फायदा घेत चोरट्यांनी खैरे यांच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट अत्यंत शिताफीने चोरले.
९ महिला भाविकही ठरल्या लक्ष्य
केवळ खैरेच नव्हे, तर मिरवणुकीत सहभागी झालेल्या इतर नऊ महिलांनाही चोरट्यांनी लक्ष केले. या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे चोरट्यांनी हातोहात लांबविली. यामध्ये खालील महिलांचे दागिने चोरीला गेले आहेत:
निकीता पाटील
लावण्या शिंदे
अरूणा पवार
निकीता निकम
मोनिका इंगळे
रंजना भालेराव
संस्कृती साठे
जयश्री तराळ
४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास
या सर्व घटनांमध्ये मिळून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. भर गर्दीत आणि पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तपास सुरू: याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार काळे अधिक तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पादचारी महिलेचे चेन स्नॅचिंग
रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना पाथर्डी फाटा भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावना शालिग्राम पाटील (रा.दत्तमंदिराजवळ, ज्ञानेश्वरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील रविवारी (दि.२९) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. दत्तराज मेडिकल स्टोअर्स समोरून त्या पायी जात असताना ही घटना घडली.
दुचाकीवर डबलसीट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची आणि सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोन्याची पेंडल असलेली सोनसाखळी हिसकावून नेली. हवालदार देवरे याचा तपास करत आहेत.