येवला, (प्रतिनिधी) ३१ मार्च - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी बांधवासाठी शेतकरी भवन इमारत बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन अत्याधुनिक सोई सुविधा असलेले शेतकरी भवन याठिकाणी उभारले जाणार आहे.
राज्य शासनाच्या “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” योजनेअंतर्गत हे भवन उभारण्यात येणार आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना निवास, विश्रांती, बैठक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना अत्याधुनिक सोई सुविधा निर्माण करून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथे आधुनिक सुविधा असलेले शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.
मंजुरीच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.या शेतकरी भवनाच्या उभारणीमुळे येवला बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना सुरक्षित व सुसज्ज निवास आणि सुविधा उपलब्ध होतील. यामुळे बाजार समितीची कार्यक्षमता वाढून कृषी व्यवहार अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या या पुढाकारामुळे येवला तालुक्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळणार असून, शेतकरी हिताच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.