नाशिक, (प्रतिनिधी) ३१ मार्च - धार्मिक पूजा-अर्चा आणि तांत्रिक विधींच्या नावाखाली महिलांची फसवणूक व अत्याचार करणाऱ्या कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवती पोलिसांचा फास आता अधिक आवळला गेला आहे. सोमवारी (दि. ३०) विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील 'ओकस प्रॉपर्टी' या कार्यालयाची पीडितेसह पुन्हा एकदा झडती घेतली. यावेळी गुन्ह्याच्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती घेण्यात आली असून, पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे.
अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ होताच, पोलिसांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. सोमवारी दुपारी पोलीस अकादमीतील चौकशीनंतर, एसआयटी पथक पीडित महिला आणि फॉरेन्सिक टीमला घेऊन थेट खरातच्या कार्यालयात पोहोचले. सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे दुवे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
गुन्ह्याचा 'डेमो' : पीडितेने घटनास्थळी नेमके काय घडले, आरोपीने संवादाची सुरुवात कशी केली आणि तिची फसवणूक कशी केली, याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
मानसिक नियंत्रणाचे तंत्र : खरात विशिष्ट मंत्रांचा वापर करून महिलांवर मानसिक नियंत्रण मिळवत असल्याचा आरोप आहे. त्या अनुषंगाने तो नेमकी कोणती पद्धत वापरत होता, याची पडताळणी पथकाने केली.
गुंगीच्या औषधांचा संशय : पीडितेला गुंगी आणण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करायला लावले होते का? या तांत्रिक बाबीची फॉरेन्सिक टीममार्फत तपासणी करण्यात आली आहे.
पोलिसांचा फास घट्ट
या झडतीदरम्यान पोलिसांनी महत्त्वाच्या नोंदी पंचनाम्यात नमूद केल्या आहेत. आरोपी खरातने तांत्रिक-मांत्रिक पूजेचा बनाव करून किती महिलांना जाळ्यात ओढले, याचाही शोध आता पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.