नाशिक, (प्रतिनिधी) ३१ मार्च - जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लाचखोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. चांदवड तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे (५६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (दि. ३०) रंगेहाथ अटक केली. या कारवाईत शाखा अभियंता कृष्णकांत जिभाऊ देवरे (२८) याचेही नाव निष्पन्न झाले असून, तो सध्या फरार आहे.
काय आहे प्रकरण?
यातील तक्रारदार हे जिल्हा परिषदेचे नोंदणीकृत कंत्राटदार आहेत. चांदवड तालुक्यातील रस्त्याचे डांबरीकरण आणि सुधारणेसाठी त्यांना ७२.८९ लाख रुपयांची निविदा मंजूर झाली होती. या कामाचे आतापर्यंत ४१ लाख रुपये मिळाले असून, उर्वरित १० लाख रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी आणि जुन्या बिलांच्या 'मोबदल्यात' बक्षीस म्हणून:
विठ्टल पठाडे (उपअभियंता): ३ लाख रुपये
कृष्णकांत देवरे (शाखा अभियंता): २.६७ लाख रुपये
अशी एकूण ५.६७ लाख रुपयांची लाच मागितली होती.
एसीबीचा सापळा आणि कारवाई:
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे धाव घेतली. सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या गेटवर सापळा रचण्यात आला. विठ्ठल पठाडे यांनी ३ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले. कारवाईची चाहूल लागताच शाखा अभियंता देवरे याने तिथून पळ काढला.
दोन आठवड्यांत दुसरा मोठा 'ट्रॅप'
विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच (१८ मार्च) कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि सहायक लेखाधिकारी अरुण धारणकर यांना ५० हजारांची लाच घेताना याच इमारतीत पकडण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता उपअभियंता जाळ्यात अडकल्याने जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे.
तपास पथक:
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपअधीक्षक सुरेश शिरसाठ करत आहेत. रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.