पवननगर भागात तरुणीवर बलात्कार... पंचवटी कॉलेजमध्ये परीक्षेला गेलेल्या तरुणीचा विनयभंग...

Share:
Main Image
Last updated: 31-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३१ मार्च - सिडकोतील पवननगर भागात लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अडीच वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर प्रियकराने नकार दिल्याने हे प्रकरण आता पोलिसांत पोहोचले असून, अंबड पोलीस ठाण्यात बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आशुतोष महेंद्रसिंग पाटील, महेंद्रसिंग पाटील आणि एका महिलेविरुद्ध (सर्व रा. चाळीसगाव, जि. जळगाव) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडिता आणि संशयित आशुतोष हे एकमेकांचे नातेवाईक असून, त्यांच्यात अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संशयिताने २०२३ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार सातत्याने सुरू होता.

पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी उपवर शोधण्यास सुरुवात केल्यावर तिने आशुतोषला लग्नाबाबत विचारले. मात्र, त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. या संदर्भात पीडितेने आशुतोषचे वडील आणि बहिणीशी संपर्क साधला असता, त्यांनी तिलाच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक निरीक्षक स्वप्नाली पलांडे अधिक तपास करत आहेत.

Advertisement

पंचवटी कॉलेजमध्ये परीक्षेला गेलेल्या तरुणीचा विनयभंग
बीबीएची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेलेल्या एका तरुणीचा परिचितानेच विनयभंग केल्याची घटना पंचवटी कॉलेज परिसरात घडली. पीडितेने आरडाओरड केल्याने संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अथर्व शंकर पवार (रा. खेडगाव, ता. दिंडोरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता सोमवारी (दि. ३०) परीक्षेचा पेपर देण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. ती पहिल्या मजल्यावर असताना संशयित अथर्व तेथे आला. "मी तुझी केव्हाची वाट पाहत आहे," असे म्हणत त्याने तिला फ्रुटी देण्याचा बहाणा केला.
पीडितेने फ्रुटी घेण्यास नकार दिला असता, संशयिताने तिचा विनयभंग केला. यावेळी झटापटीत तिचा हात पिरगळल्याने पीडितेने आरडाओरड केली. लोकांच्या भीतीपोटी संशयिताने तेथून धूम ठोकली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राजुळे करत आहेत.

Comments

No comments yet.