मुंबई, (प्रतिनिधी) ३१ मार्च - राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता कायदेशीर कारवाईला वेग आला असून, मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात पहिली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. एका ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवरून चक्क त्याच्याच भावाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रान्सजेंडरच्या भावाने अन्न व औषध प्रशासनात (FDA) नोकरी लावण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, व्हायरल झालेला व्हिडीओ हा मूळ स्वरूपात नसून, तो 'एडिट' करून किंवा त्यात तांत्रिक छेडछाड करून पसरवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांची कलमे आणि तपास
कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७९, ३५१(१) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. गोपनीयता भंग करणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे आणि खंडणीसाठी धमकावणे यांसारख्या गंभीर कलमांचा यात समावेश आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक अंगाने तपास करत आहेत.
विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, झिरवाळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "हा व्हिडीओ दोन-तीन वेगवेगळ्या क्लिप्स जोडून तयार करण्यात आला असून माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे," असा पवित्रा झिरवाळ यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांची भूमिका
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हा व्हिडीओ बनावट असल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओची फॉरेन्सिक आणि तांत्रिक शहानिशा केली जाईल. सत्यता तपासल्यानंतरच यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.