नाशिककरांनो इकडे लक्ष द्या... महापालिकेचे 'महा-शटडाऊन'.. सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार...

Share:
Main Image
Last updated: 03-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ एप्रिल - नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेली पायाभूत सुविधांची कामे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या तातडीच्या दुरुस्तीसाठी नाशिक महानगरपालिकेने संपूर्ण शहरात दोन दिवसांचा 'शटडाऊन' जाहीर केला आहे. परिणामी, शनिवार दि. ४ एप्रिल आणि रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोमवार दि. ६ एप्रिल रोजी देखील सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

विभागावर अशी होणार कामे:
१. नाशिक पूर्व आणि पश्चिम विभाग:
कलानगर जलकुंभाची गुरुत्व वाहिनी जोडणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथील मुख्य वाहिनीची गळती काढण्याचे काम केले जाईल. यासाठी साधारण १२ ते २४ तास लागतील.
२. नाशिक रोड विभाग:
येथे सर्वाधिक ३६ तासांचे काम नियोजित आहे. यात ९०० मी.मी. व्यासाच्या रॉ-वॉटर लाईनचे क्रॉस कनेक्शन आणि गांधीनगर जलकुंभाजवळ स्मार्ट सिटीमार्फत 'फ्लो मीटर' बसविण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले जाईल.
३. पंचवटी आणि सातपूर विभाग:
पेठ रोड, मखमलाबाद आणि आरटीओ ऑफिस परिसरातील नवीन जलकुंभांच्या जोडण्या केल्या जातील. सातपूरमधील कडेपठार, कार्बन नाका आणि पाटील फार्म परिसरातील १२ton मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिन्यांची गळती काढण्याचे काम अंदाजे १२ तासांत पूर्ण केले जाईल.
४. नवीन नाशिक (सिडको):
पाथरडी फाटा, लेखानगर, गोविंद नगर आणि भवानी माता जलकुंभ परिसरातील पाईपलाईन लिकेज काढणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीची एकूण ९ मोठी कामे येथे हाती घेण्यात आली आहेत.
५. १५ वा वित्त आयोग व गंगापूर धरण:
गंगापूर धरण ते बारा बंगला १८०० मी.मी. व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामांतर्गत 'ब्लू ओशन' आणि 'संत कबीर नगर' येथे क्रॉसिंगचे काम केले जाणार आहे. या कामासाठी ४८ तास लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

नागरिकांना आवाहन
"शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सिंहस्थ पूर्वतयारीसाठी ही कामे करणे अत्यावश्यक आहे. या कालावधीत नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे," असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) यांनी केले आहे.

महत्त्वाचे लक्षात ठेवा:
पाणी बंद: शनिवार (४ एप्रिल) आणि रविवार (५ एप्रिल) संपूर्ण दिवस.
कमी दाबाने पुरवठा: सोमवार (६ एप्रिल) सकाळी.
कारण: सिंहस्थ प्राधान्य कामे, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि मुख्य जलवाहिन्यांची गळती दुरुस्ती.

Comments

No comments yet.