नाशिक, (प्रतिनिधी) ३१ मार्च - महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्राधिकरण (अमृत) तर्फे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थांनी 29 एप्रिल, 2026 पर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेले खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ब्राम्हण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यांगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाण, कानबी प्रवर्गातील उमदेवार अर्ज करू शकतात. सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रूपये 10 हजार इतके, तसेच मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रूपये 5 हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
योजनेविषयी अधिक माहिती, अटी व शर्ती तसेच अर्ज प्रक्रिया केवळ अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करताना कोणतीही अडचण आल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही अमृतचे व्यवस्थापकीय संचालक यांनी कळविले आहे.